कुसुमाग्रज कविता संग्रह

कुसुमाग्रज कविता संग्रह, Kusumagraj Kavita Sangrah, मराठी कविता, यांचा पहिला काव्यसंग्रह PDF Free Download

कुसुमाग्रज कविता संग्रह PDF Download

कुसुमाग्रजांच्या 10 प्रसिद्ध कविता या लेखाद्वारे आपण आज कवी कुसुमाग्रजांच्या काही कवितांचे कौतुक करणार आहोत. कवी कुसुमाग्रजांनी आपल्या लेखनशैलीने मराठी साहित्यावर एक वेगळा प्रभाव टाकला आहे. मराठी साहित्याचा जगभर प्रसार करणारे मराठा शिल्पकार कुसुमाग्रजांना खूप मानतात.

अनेक समकालीन लेखकांवर प्रभाव टाकणारे कवी कुसुमाग्रजा हे मराठी साहित्याचे श्रीकृष्ण म्हणून ओळखले जातात. दस्तुरखुद्द कुसुमाग्रजा यांनी मराठी साहित्याला एक नवीन दृष्टीकोन आणि नवे वळण देण्याचे काम केले आहे. आज आपण कुसुमाग्रजांच्या 10 सुप्रसिद्ध कविता पाहणार आहोत. पण आधी कुसुमाग्रजांबद्दल सांगा.

कुसुमाग्रज कविता संग्रह

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर

शहरातील पाच पुतळे

एका चौथऱ्यावर बसले

आणि टिपं गाळू लागले .

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो

फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले ,

मी फ़क्त मराठ़्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,

मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद़्गारले ,

मी तर फ़क्त

चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला

आणि ते म्हणाले ,

तरी तुम्ही भाग्यवान.

एकेक जातजमात तरी

तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र

फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही

करावी किती भास्करा वंचना

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी

कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे

न ती आग अंगात आता उरे

विझोनी आता यौवनाच्या मशाली

ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे

अविश्रांत राहील अन् जागती

न जाणे न येणे कुठे चालले मी

कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी

शिरी टाकिती दिव्य उल्काफुले

परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा

मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात

वेचूनिया दिव्य तेजःकण

मला मोहवाया बघे हा सुधांशू

तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे

ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव

पिसाटापरी केस पिंजारुनी हा

करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी

पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ

करी प्रीतीची याचना लाजुनी

लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून

येतो कधी आठवाने वर

शहारून येते कधी अंग तूझ्या

स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे

मिळोनी गळा घालुनीया गळा

तुझ्या लाल ओठातली आग प्यावी

मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्

मला ज्ञात मी एक धुलिःकण

अलंकारण्याला परी पाय तूझे

धुळीचेच आहे मला भूषण

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता

रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता

अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता

भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील

जाळीत चालले कणखर ताठर दील”

माघारी वळणे नाही मराठी शील

विसरला महाशय काय लावता जात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ

छातीवर तुटली पटबंधाची गाठ

डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ

म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ

जरी काल विसरलो जरा मराठी जात

हा असा धावतो आज अरि-शिबिरात

तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले

सरदार सहा, सरसावूनी उठले शेले

रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले

उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना

अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना

छावणीत शिरले थेट भेट गनिमांना

कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी

समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी

गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा

ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा

अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार

अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत

पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?

सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश

पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश

तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार

कधीही तारांचा संभार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान

कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान

संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान

बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान

मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?

अहो हे कसले कारागार?

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती

होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती

कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे

बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे

एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार

होता पायतळी अंगार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत

अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत

सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात

बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात

तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार

तयांना वेड परि अनिवार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात

तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात

चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार

देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर

देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार

आई वेड्यांना आधार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

सरणावरती आज अमुची पेटता प्रेते

उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते

लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार

आई, खळखळा तुटणार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास

नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास

रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर

पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर

शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार

मरणा, सुखेनैव संहार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।

मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।

काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।

अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।

एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।

करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।

मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।

कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।

करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।

इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।

भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

कोलम्बसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या

समुद्रा, डळमळू दे तारे !

विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे

ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले

दडुद्या पाताळी सविता

आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला

करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान

मिळाया प्रमत्त सैतान

जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती

करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे

फुटू दे नभ माथ्यावरती

आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी

नाविका ना कुठली भिती

सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा

झूंजण्या अखंड संग्राम

नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे

दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे

असे का हा आपुला बाणा

त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी

जपावे पराभुत प्राणा ?

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती

जशी ती गवताची पाती

नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली

निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा

घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात

जिंकुनी खंड खंड सारा !

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती

कथा या खुळ्या सागराला

“अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अन आशा

किनारा तुला पामराला”

बर्फाचे तट पेटुनी उठले

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते

रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे

अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?

कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?

साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे

रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे

एक हिमालय राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे

समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले

कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले

काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले

शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे

कोटि कोटि देहांत आज या एक मनिषा जागतसे

पिवळे जहरी सर्प ठेचणे – अन्य मना व्यवधान नसे

एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे. धगधगते

गाभारा

दर्शनाला आलात? या..

पण या देवालयात, सध्या देव नाही

गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.

सोन्याच्या सम्या आहेत, हिऱ्यांची झालर आहे.

त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.

वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या

पाहीलात ना तो रिकामा गाभारा?

नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे

काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,

दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा

दोन तास वामकुक्षी घ्यायचा

सार काही ठीक चालले होते.

रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग

पडत होते पायाशी..

दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते

मंत्र जागर गाजत होते

रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.

बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे

पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव

उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला

कोणी एक भणंग महारोगी

तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”

आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय

गाभारा रिकामा

पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..

परत? कदाचित येइलही तो

पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर

त्याला पुन्हा..

प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,

आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी

पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.

तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,

कारण गाभारा सलामत तर देव पचास.

निरोप

गर्दीत बाणासम ती घुसोनि

चाले, ऊरेना लव देहभान

दोन्ही करांनी कवटाळूनीया

वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती

हो दहन ते स्त्रीपण संगरात

आता ऊरे जीवनसूत्र एक

गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा

तेथेही जागा धनिकांस आधी

आधार अश्रूसही दौलतीचा

दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी

राहे जमावात जरा उभी ती

कोणी पहावे अथवा पुसावे?

एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी

झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे

फेकूनिया बाळ दिले विमाने

व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

“जा बाळा जा, वणव्यातुनी या

पृथ्वीच आई पुढती तुझी रे

आकाश घेईं तुजला कवेंत

दाही दिशांचा तुज आसरा रे”

ठावे न कोठे मग काय झाले

गेले जळोनीं मन मानवाचे

मांगल्य सारे पडले धुळीत

चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

कणा

“ओळखलत क सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !